शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Wednesday 31 May 2017

वाडगेभर निर्जीव अन्न :


"अ बाउल ऑफ डेड फूड" या माझ्या wordpress च्या ब्लॉगबद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी ही पोस्ट अजून विस्तृत करून मराठीमध्ये लिहिली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल, असे वारंवार सुचवले. ही पोस्ट त्या वाचकांना समर्पित !

आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात फूड इंडस्ट्रीमध्ये अफाट, आमूलाग्र technical क्रांती झाली आहे. गमतीने आपण म्हणतो, काही धंदा चालो ना चालो पण वडापावची गाडी आणि खाण्याचे दुकान याला मरण नाही. किती खरे आहे हे.आज सर्वात जास्त नफा फूड इंडस्ट्री, हॉटेल आणि फूड manufacture सेक्टर कमावतंय. उद्याही हेच चित्र असेल किंबहुना अजून विस्तार वाढला असेल.

ज्या वेगात हा 'रेडी टू ईट' पदार्थांचा उद्योग फोफावतोय, त्याच वेगात lifestyle disorders औषधी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातही वाढ होतेय. याचा अर्थ असा तर नाही ना की, फूड इंडस्ट्री औषधी मार्केटसाठी कस्टमर तयार करतेय? दुर्दैवाने काही अंशी ते खरेही आहे. काही घरात 'रेडी टू ईट' पदार्थ हे अगदी रोज, खूप प्रमाणात खाल्ले जातात. अगदी लहान मुलांनाही दिले जातात. (हो, कारण जाहिरातीत टार्गेट ऑडियन्स लहान मुले व त्यांच्या आयाच असतात )
'रेडी टू ईट' पदार्थांची यादी भली मोठी आहे. आज उदाहरणादाखल आपण घेऊ ....
कॉर्न फ्लेक्स, ओट मिल, चॉकोस, मुसेली इत्यादि :
अति उच्च तापमानात, अति दाबाखाली मूळ धान्यातील पाण्याचा अंश काढून हे पदार्थ तयार होतात. उष्णता, अति दाब यामुळे यातील नैसर्गिक पोषणमूल्ये जवळजवळ नष्ट होतात. राहतो तो निर्जीव पोषणमूल्यरहित चोथा! आता हा चोथा कोण खाणार म्हणून मग त्यात टाका कृत्रिम व्हिटॅमिन, कॅल्शिअम,  लोह इत्यादि, जे शरीरात नीट शोषले जाईल याची काही शाश्वती नाही.

किती गम्मत आहे नाही? आधी त्या धान्याचा जीव घ्या आणि मग त्यात परत जीव आणण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यात मूळ पदार्थांपेक्षा processing कॉस्ट वाढलेली असते तसेच टिकवणे, चव वाढवणे,  दिसायला आकर्षक असावे या गोष्टीतून त्यात वेगवेगळी रासायनिक preservatives, रंग, मीठ, साखर आणि फ्लेवरची भर पडते. काही ब्रॅण्ड्समध्ये तर वाळवलेल्या भाज्या, फळेही असतात. समस्त पिरॅमिड रिटर्न mummy, मृत शाक, फल, धान्य संमेलनच जणु !

असे पदार्थ वारंवार खाण्यात असणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा आणि असे पदार्थ न खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा अभ्यास केला असता, हे पदार्थ खाणाऱ्या स्त्रियांमध्ये स्थूलता, अतिउच्चरक्तदाब, तसेच मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. कमालच आहे! पण जाहिरातीत तर सुडौल कमरेची बाई हे ३ आठवडे खा आणि वजन कमी होईल असे सांगत असते. वरून टाकलेल्या मीठ,  साखरेचे परिमाण दुसरे काय. आयुर्वेदानुसार असे निर्जीव, अति उष्णतेचा संस्कार झालेले, कोरडे अन्न हे वात दोष वाढवून शरीरात अनेक व्याधी उत्पन्न करण्याचे एक मुख्य कारण मानले जाते.

ओट हे तर अतिशय निकृष्ट धान्य वर्गात गणले जावे, इतके याचे पोषणमूल्य कमी आहे. ओटचा ग्लायसिमीक इंडेक्स (म्हणजे हे पचवताना रक्तातील वाढलेली साखरेची पातळी) ही जास्त असते. मी प्रत्यक्षात मात्र खूप मधुमेही रुग्णांना, "डॉक्टर, म्हणजे मी अगदी नियमित ओट मिल घेते, unhealthy असे काहीच खात नाही हो." असे भक्तिभावाने सांगताना पाहते. बसतोय ना धक्का एक एक वाचून. असो !
ओट meal नियमित घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कुपोषणाचे सगळी लक्षणे आढळून येतात, ज्यामुळे हाडे, सांधेदुखी, थकवा, पचनाच्या तक्रारी,  मलबद्धता, अहो, इतकीच नाही ही गोष्ट! अगदी आतड्यामध्ये मार्गावरोध होणे (intestinal obstruction, जी सिरिअस स्थिती असते) इतपत आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. याला डेटा,  research, सगळ्याचा आधार  आहे. गुगल करा.

मूळ म्हणजे पोषणरहित अन्न खाऊन शरीराचे हाल करा, वजन आपोआप कमी होईल ही विचारसरणीच किती भयानक आहे. सत्य आहे - आजच्या मनी ओरिएंटेड सोसायटीचे ! दुसरे काय?

'रोज रोज ताजा नाश्ता बनवणे शक्य नसते हो', 'खूप सवय झाली या पदार्थांची, आता मुले ऐकत नाहीत', 'असे कसे चालते मार्केटमध्ये, जर एवढे दुष्परिणाम असतील तर?'

 - या सगळ्याला एकच उत्तर आहे, 'ब्रॅण्डिंग'!
'ब्रॅण्डिंग'ची माया जी मला, तुम्हाला,आपल्या मुलांना बरोबर जाळ्यात ओढते. जाहिरात, सुंदर सुंदर मॉडेल आणि भ्रम निर्माण करणारे मोठे मोठे दावे! यात अगदी आयुर्वेदिक, आयुर्वेदिक म्हणून झेंडा फडकवणारे शांतंजली किंवा इतर हर्बल कॉर्न फ्लेक, मुसेलीवाले पण येतात बरं का!
आयुर्वेद वेगळा, स्वदेशी वेगळे, गल्लत नको.
अरे हो हल्ली 'रेडी टू ईट व मेक' पोहे, खिचडी, सांजा अशीही पाकीटे  मिळतात बरं का! तेही याच गटातले आहेत, विसरू नका.
अगदी क्वचित कधीतरी, पर्याय नाही, म्हणून हे पदार्थ खाणे समजू शकते.  परंतु अगदी वारंवार, खूप प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचे घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तीस हे खाण्यास देत असाल तर, नक्की परत विचार करा.
आपल्या आजूबाजू सहज मिळणाऱ्या ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, साळीच्या लाह्या ह्या वरील पदार्थाना उत्तम पर्याय ठरू शकतात. बाकी, ताज्या नाश्त्याच्या पदार्थांबाबत मी मागेच एक पोस्ट सविस्तर लिहिली आहे.
आपण राहतो त्या भौगोलिक परिस्थितीला, शरीराला उपकारक व अनुसरून आपले पारंपरिक पदार्थ असतात. आळीपाळीने असे पारंपरिक व ताजे पदार्थ खाण्यात ठेवणे कधीही उत्तम.
ताजे खा, साधे खा, निरोगी राहा.

रुपाली पानसे -
मो. 9623448798