भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलतर्फे येत्या दोन वर्षांत उपग्रह (सॅटेलाइट) फोन सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. ही सेवा सर्वांसाठी असणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांची मोबाइलची सेवा अचानक ‘डाउन’ होण्याच्या समस्येपासून सुटका होण्याची शक्यता आहे.
‘बीएसएनएल’चे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव म्हणाले की,‘ आम्ही इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशनकडे यासंदर्भात अर्ज केला आहे. या प्रक्रियेला काही वेळ लागण्याची शक्यता आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांमध्ये आम्ही देशभर सॅटेलाइट फोनसेवा सादर करू. सॅटेलाइट फोनचे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात ते सेवा देऊ शकतील. इतकेच नव्हे तर, विमानात किंवा पाणबुड्यांमध्येही ते सेवा देण्यास सक्षम आहेत. परंपरागत मोबाइल टॉवर आजूबाजूच्या पंचवीस ते तीस किलोमीटर क्षेत्रातच कार्यरत राहू शकतात. मात्र, सॅटेलाइट फोनच्या सेवेवर कार्यक्षेत्राची मर्यादा येत नाही.’
सॅटेलाइट फोनसाठी ‘बीएसएनएल’तर्फे ‘INMARSAT’सेवेची मदत घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा सरकारी आस्थापनांसाठी कार्यरत होणार आहे. त्यामध्ये पोलिस, रेल्वे, बीएसएफ आदींचा समावेश आहे. त्यानंतर सर्वसामान्यांनाही सॅटेलाइट फोनचा उपयोग करता येणार आहे. सध्या देशात अतिशय अल्प प्रमाणात सॅटेलाइट फोनचा वापर केला जातो.