भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच एक रूपये मुल्याची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने 30 मे रोजी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले. या पत्रकात म्हटल्याप्रमाणे भारत सरकारकडून एका रूपयाच्या नव्या नोटेची छपाई पूर्ण झाली आहे. नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या चलनात असलेल्या एक रूपयाच्या जुन्या नोटा वैधच राहणार आहेत. नवीन नोट पुढच्या आणि पाठच्या दोन्ही बाजुंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल. या नोटेच्या दोन्ही बाजुंना केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांची स्वाक्षरी असेल. या नोटेवर ‘भारत सरकार’ या शब्दांबरोबरच एक रूपयाच्या नव्या नाण्याची प्रतिकृतीही असेल. तसेच भारतातील सर्व चलनी नोटांवरील ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य नोटेवर छापण्यात आले आहे.
नोटेच्या अन्य भागावर महाराष्ट्रातील ‘सागर सम्राट’ या तेल उत्खनन केंद्राची प्रतिमा आहे. याशिवाय, नोटेवर ‘L’ हे अक्षर कॅपिटलमध्ये छापण्यात आले आहे. तसेच नोटेवर अशोक स्तंभाच्या प्रतिमेबरोबर ‘1’ ही संख्या आणि ‘भारत’ हा शब्द अदृश्य स्वरूपात छापण्यात आला आहे.