हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखालील दुहेरी बोगद्याचे बांधकाम पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. देशातील हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरणार आहे. कोलकात्यातील रेल्वेच्या १६.६ किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पांतर्गत ५२० मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.
नदीखाली ३० मीटर खोल या बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे. यातील एक मार्ग पूर्वेकडे, तर दुसरा मार्ग पश्चिमेकडे जाणार आहे. हावडा आणि महाकरण मेट्रो स्टेशनदरम्यान ये-जा करणारे प्रवासी या बोगद्यात प्रवासादरम्यान फक्त एक मिनिटासाठी असतील. मेट्रो ट्रेन या बोगद्यातून ८० किमी प्रतितास या वेगाने धावणार आहे. १६.६ किमी लांबीच्या या मेट्रो प्रकल्पामध्ये १०.६ किमी लांबीचा बोगदा असून त्याचा ५२० मीटरचा भाग नदीखालून जाणार आहे. नदीखालून बोगदा तयार करण्यासाठी ६० कोटी रुपयांचा खर्च आला आहे; तर संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचा खर्च सुमारे ९ हजार कोटी रुपये आहे.
नदीखालील बोगद्याच्या निर्मितीचे काम गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झाले होते. पूर्व-पश्चिम मेट्रो ऑगस्ट २०१९मध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बोगद्यामध्ये पादचारी मार्ग तयार केले जाणार आहेत.