शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Thursday 1 June 2017

अँड्रॉइड फोनवर‘ज्युडी’चा हल्ला


तुमच्याकडे अँड्रॉइड प्रणाली आधारित स्मार्टफोन असेल आणि तुम्ही एखादे अॅप सुरू केल्यावर स्क्रीनवर आलेली जाहिराती पाहण्याच्या मोहात पडला असाल तर सावधान! तुमच्या मोबाइलला ज्युडी या मालवेअरची लागण होण्याचा धोका आहे. कम्प्युटरना ग्रासलेल्या ‘वॉनाक्राय’ या मालवेअरच्या धक्क्यातून जग नुकते सावरत असतानाच या नव्या मालवेअरचा धुमाकूळ सुरू झाला आहे.

ज्युडीची लागण आतापर्यंत ८.५ ते ३६.५ दशलक्ष वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनना झाल्याची भीती चेकपॉइंट या सायबर सुरक्षा सोल्युशन्स एजन्सीने व्यक्त केली आहे. या मालवेअरने गुगलचे अधिकृत अॅप स्टोअर असलेल्या ‘गुगल-प्ले’लाच आपले लक्ष्य बनवले आहे. ज्युडी हे मालवेअर जाहिरातींना चिकटत असल्याने त्याला अॅडवेअर असे म्हणण्यात येत आहे. ज्युडीची लागण एका कोरियन कंपनीने विकसित केलेल्या ४१ अॅपना झाल्यामुळे ज्युडीचे प्रताप उघड होऊ लागले. मात्र, ज्युडीमुळे किती देशांना फटका बसला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गुगलप्लेवर उपलब्ध अॅपपैकी अनेक अॅप या मंचावर वर्षानुवर्षे उपलब्ध आहेत. यातील अनेक अॅप्स अद्ययावत केले गेले आहेत. त्यामुळेच नेमक्या कोणकोणत्या अॅपना ‘ज्युडी’ची लागण झाली आहे, अर्थात कोणकोणत्या अॅपच्या आज्ञावलीमध्ये ज्युडीने स्वतःचे कोड घुसवले आहेत, हे कळण्यास वाव नाही. चेक पॉइंटने ज्युडीविषयी माहिती जाहीर केल्यावर गुगलप्लेने तत्काळ असे बाधित अॅप काढून टाकले आहेत.

▪️ज्युडीची कार्यप्रणाली

अँड्रॉइड प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर पॉपअप होणाऱ्या जाहिरातींतून ज्युडी त्या मोबाइल फोनमध्ये प्रवेश करतो. मग वारंवार जाहिराती पॉपअप करून त्यावर क्लिक करण्यासाठी मोबाइल वापरकर्त्याला उद्युक्त करतो. अशा प्रत्येक क्लिकबरोबर या मालवेअरच्या निर्मात्यांसाठी ज्युडी महसूल मिळवतो.