शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

जगताना काही चुकतय का ?



काल मी अॉफीसातनं लवकर घरी आलो. साधारण पणे मी घरी रात्री 10 वाजेनंतर येतो काल 8 वाजताच आलो.

ठरवलं होतं की घरी जावून थोडावेळ बायकोशी बोलेल मग मी विचारेल की आज आपण बाहेर जेवायला जाऊयात. खूप वर्षांपूर्वी आम्ही असं करायचो.

घरी आलो तर बायको टीवी पहात होती. मला वाटलं जोपर्यंत ती ही सीरियल पहात आहे तोपर्यंत आपण लॅपटॉप वर काही मेल चेक करून घेवूयात. मी लगेच मेल चेक करायला लागलो. थोड्या वेळानं बायको चहा घेवून आली मी चहा पितपित अॉफीसचं काम करायला लागलो. 
अाता मनात आलं होतं की, हिच्यबरोबर बसून गप्पा मारूयात मग जेवायला बाहेर जावूयात, पण केव्हा 8 चे 11 वाजले कळलंच नाही.

बायकोने जेवण वाढलं मी चुपचाप जेवायला बसलो. जेवतांना मी म्हणालो की आपण जेवणानंतर खाली थोडं फिरायला जावूयात गप्पा मारूयात.  यावर बायको खुश झाली.

मी जेवण करत असतांनाच टीव्ही वर माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला. जेवता जेवता मी कार्यक्रमात गुंगलो . कार्यक्रम पहाता पहाता सोफ्यावरच झोपी गेलो. जेव्हा जाग आली तेव्हा मध्य रात्र झाली होती.

खूप वाईट वाटलं . मनात ठरवून आलो होतो की आपण लवकर यायचा फायदा घेवून आज थोडावेळ बायको सोबत घालवेल. पण इथं सायंकाळच काय रात्र देखील निघून गेली.

असंच होतं आयुष्यात . आपण विचार करतो वेगळा आणि होतं वेगळंच. आपण विचार करतो  की आपण एक दिवस जगूत पण आपण कधीच जगतच नाही. आपण विचार करतो की ह्या दिवशी आपण हे करूयात पण करू शकत नाही. 

आर्ध्या रात्री सोफ्यावरनं उठलो हात पाय धूवून आंथरूणावर आलो तर बायको संपूर्ण दिवस काम करून थकली होती म्हणून झोपी गेली. मी पण गुपचूप बेडरूम मधल्या खुर्चीवर बसून विचार करत होतो.
सतरा वर्षांपूर्वी ह्या मुलीला पहिल्यांदा भेटलो होतो हिरव्या रंगाच्या पंजाबी ड्रेस मध्ये. मी हिच्याशी लग्न केलं होतं. मी वचन दिलं होतं की सुखात दुखात जीवनातील कोणत्याही वळणावर मी तुला साथ देईन.  

पण ही कसली साथ?  मी सकाळी उठतो तर आपल्या कामात व्यस्त होतो. ती सकाळी जागी होते तर माझ्यासाठी चहा बनवते. चहा पिऊन मी जगाशी जोडला जातो तर ती नाश्त्याची तयारी करते . मग आम्ही दोघं व्यवसायाच्या कामाला लागतो.  मी अॉफीसच्या तयारीला लागतो तर ती त्या सोबतच माझ्या लंचची व्यवस्था करते मग आम्ही दोघं भविष्याच्या कामात जुंपले जातो. 
मी एकदा अॉफीसात गेलो की ही मी माझी शान समजतो की माझ्याशिवाय माझ्या अॉफिसाचं काम चालत नाही. ती आपलं काम निपटून डिनरच्या तयारीला लागते. 

रात्री घरी उशिरा येतो जेवण करून सुस्त होवून जातो. एक संपूर्ण दिवस खर्च होतो जगायच्या तयारीत. 

ती पंजाबी ड्रेस मधली मुलगी माझ्याकडं कसलीही तक्रार करत नाही. का करत नाही मला नाही ठावूक. पण माझी स्वतःविषयीच तक्रार आहे. मनुष्य ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याचीच सगळ्यात कमी परवा  करतो. का ?
 
बऱ्याचदा वाटतं की आपण आता स्वतःसाठी काम नाही करत आहोत. आपण एखाद्या अज्ञात भयाबरोबर लढण्यासाठी काम करतो आहोत. आपण जगण्यासाठी आपलं आयुष्य बरबाद करतो आहोत.

कालपासनं विचार करतोय तो कोणता दिवस असेल जेव्हा आपण जगायला सुरवात करू ?

आपण काय फक्त गाडी, टीव्ही , फोन, कॉंम्प्यूटर, कपडे खरेदी करण्यासाठीच जगतो आहोत का? 

मी तर विचार करतोच आहे आपण पण करा .

आयुष्य खूप छोटं आहे. त्याला असंच वाया घालवू नका. अापल्या प्रेमाला ओळखा त्याच्या सोबत वेळ घालवा. जीनं अापल्या आई ,वडील, बहिण, भाऊ तसेच सख्खे नातेवाईक सोडून तुमच्याशी नातं जोडलंय आपल्या सुखदुःखात सामील व्हायचं वचन दिलंय तिला विचारा तर खरं. 

एक दिवस पश्चाताप करत बसण्यापेक्षा जे सत्य आहे ते आजच समजून घ्या की आयुष्य हे मुठीतल्या रेती सारखं असतं कधी ते मुठीतनं कधी निसटून जाईल कळणार देखील नाही.