शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

लाल बहादूर शास्त्री - 2

श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1901 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.
लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले.
उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना नन्हे नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे. वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली.
गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते.

ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव शास्त्री होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.


वरील भाषण पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.