शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

भारतीय राष्ट्रध्वज

      भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. यामुळे या झेंड्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मधल्या पांढर्‍या रंगात निळ्या रंगाचे २४ आर्‍यांचे अशोक चक्र आहे. मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे). २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला.
त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढर्‍या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असलेल्य सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे
ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.
- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
- मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध होतो.
- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे

वरील भाषणाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://drive.google.com/open?id=0B1OERS5aa410MURhM1hMSW9ZVm8