शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

आपण फुलवलेली बाग सोडताना


काळजातलं सगळं 
काळजात ठेवून यावं लागतं
ते गाव आलं की 
खिडकी ढकलून
पापण मिटावं लागतं 

देवळात मुर्ती असते 
पत्थराची पाथरवटानं
घडवलेली,
शाळेत मात्र देवरुप
बालकं घडवण्याचं
काम घडत असतं.

माळी प्रत्येक झाडाला
बहरवत असतो 
पाण्याबरोबर घामाच्या सिंचनाने.

मायेच्या हातांची सवय झालेल्या रोपांचे संगोपन 
करणा-या त्या माळीदादाची 
अचानक होते बदली
दुस-या प्रयोगशील
बागेत.

सर्व माळी सारखेच
अन् बागा सारख्याच
पण प्रश्न असतो 
माळी अन् त्या रोपांमध्ये
निर्माण झालेल्या 
अतुट नात्याचा,
आपण फुलवलेली बाग 
सोडताना,
स्वतः टप्प्याटप्प्यावर जपलेल्या 
रोपांकडे पाठ 
करून जाण्याचा.
मी येतो,पुन्हा भेटूच
म्हणून आश्वस्त केलेल्या
चिमुकल्या रोपांच्या
वाट पाहण्याचा. आपण 
घडवलेली शाळा व विद्यार्थी सोडून जाताना
असंच माळीदादासारखंच 
होत असेल की गुरुजींचं !