सायमन कमिशन एकाही
भारतीय सदस्याला न घेता लाहोरला आले. लाहोरला पंजाबकेसरी लाला लजपतराय यांनी
कमिशनची वाट अडवली. पोलीस अधिकारी स्कॉट याने साँडर्स याच्यासमवेत लालाजींवर
जबरदस्त लाठीमार केला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या दिवशीच सायंकाळी
लाहोरच्या प्रचंड सभेत देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी गरजल्या, ‘‘लालाजीकी चिता की
आग ठंडी होने के पहलेही किसी भारतीय नौजवान ने इस क्रूरता का बदला लेना चाहिये!’’
त्यांच्या या शब्दांनी सरदार भगतसिंह व्याकूळ झाले. त्यांनी स्कॉटला मारण्याचा
प्रस्ताव पार्टीत मांडला. स्कॉटला मारल्यानंतर न्यायालयासमोर तर्कसंगत भाषण करणे
आवश्यक होतं, की स्कॉटला का
मारावे लागले? आणि हे काम भगतसिंह
करू शकत होते. पण राजगुरूंना हे मान्य नव्हते. राजगुरू हट्टाने पेटून उठले.
त्यांना मोहिमेत सामील केले गेले.
वरील भाषणाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
योजना अशी आखण्यात
आली की, मालरोड पोलीस
स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि भगतसिंग व
राजगुरू त्याच्या इशार्यावर गोळीबार करतील. पण ४ दिवस स्कॉट त्या भागात फिरकलाच
नाही. शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जय गोपाळने
भगतसिंहांना खूण केली की हाच स्कॉट असावा, यावर भगतसिंहांनी खुणेनेच सांगितले की हा नसावा, पण ही ‘नसावा’ ची खूण राजगुरूंच्या
लक्षातच आली नाही. राजगुरूंनी साहेबाच्या दिशेने गोळी झाडली. लगेचच भगतसिहांनी
आपल्या पिस्तुलातून ८ गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवे केले. एव्हाना गोळ्यांचा
आवाज ऐकून चौकीतील लोक बाहेर जमले. त्यातला एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून
गेला. राजगुरूंचे पिस्तूल नेमके या वेळी चालत नव्हते. त्यामुळे राजगुरूंनी झटकन
पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याला कमरेला धरून इतक्या जोरात आपटले, की तो सर्व गोंधळ संपेपर्यंत तो उठलाच
नाही. या सर्व गडबडीत भगतसिंह यांच्या पिस्तुलातील ‘मॅगझिन’ खाली पडले.
राजगुरूंच्या हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी प्रसंगावधान राखत, स्वतःचा जीव धोक्यात घालून, ते मॅगझिन शिताफीने उचलले. या राजगुरूंच्या कृतीमुळे चंद्रशेखर
आझादांसह त्यांचे सर्व सहकारी राजगुरूंवर खूष झाले. मेला तो स्कॉट नसून साँडर्स
होता हे कळल्यावर त्या दोहोंना अर्थातच विशेष दु:ख झाले नाही.
साँडर्स हत्येनंतर
लाहोरहून भगतसिंग एका मिलिटरी ऑफिसरच्या वेषात राजकोटला निसटले. (या वेळी भगवतीचरण
व्होरा यांच्या पत्नी दुर्गाभाभी यांनी भगतसिंहांच्या पत्नी असल्याचे नाटक
तान्ह्या लेकरासह केले होते.) राजगुरू त्यांचे नोकर आणि आझाद हे मथुरेतील
पंड्याच्या रूपात भगतसिंहाबरोबर होते. तिघेही दिवसाढवळ्या, `जागृत' पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून, एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले. त्यानंतरच्या
काळात राजगुरूंनी लाठीकाठीचा वर्ग अगदी काशीच्या मुख्य पोलीस स्टेशनसमोर
कंपनीबागेत सुरू ठेवला. राजगुरूंच्या या धारिष्ट्यास काही सीमाच नव्हती. बरेच
महिने राजगुरू काशीत उघडपणे,
निर्भयतेने
वावरत होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या धनुष्यबाणाचे कौशल्यही लोकांनी गणेशोत्सवात
पाहिले. पण कोणासही कल्पना नव्हती की इतका साधा दिसणारा मनुष्य मोठा क्रांतिकारक
असेल! अनेक महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले. पण अखेर सप्टेंबर, १९२९ मध्ये ते पुणे येथे पोलिसांच्या
ताब्यात सापडले.
पुढे जेलमध्ये आमरण
उपोषण, न्यायालयाच्या
कामकाजावर बहिष्कार ह्या घटना घडल्या. भगतसिंग, सुखदेव व अन्य काही क्रांतिकारक त्यांच्या समवेत होतेच. सर्व
क्रांतिकारकांना आपले भविष्य माहीत होतेच, पण शिवराम राजगुरूंना मित्र भेटल्याचा आनंद झाला, तसेच राजगुरू भेटल्यामुळे इतरांमध्येही एक
चैतन्य निर्माण झाले.
सर्वांना राजकीय
कैदी म्हणून वागणूक मिळावी यासाठी क्रांतिकारकांनी उपोषण सुरू केले. राजगुरू
अर्थातच पुढाकार घेत होते. डॉक्टर रोज सकाळी १०-१२ सहकार्यांना घेऊन रबरी नळीने, जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न करीत.
या पोलिसांच्या प्रयत्नांमुळे राजगुरूंसह सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागला, शारीरिक हाल-अपेष्टांचा सामना करावा
लागला. पण याही स्थितीत सर्वच जण उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते.
लाहोर खटल्याचा
निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय
गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले. या तिघांच्या बलिदानाचा
२३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन
म्हणून पाळण्यात येतो.
( माहिती स्त्रोत – विकिपीडिया )
वरील भाषणाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.