१९०६ साली सुरू
झालेल्या वंगभंग चळवळीत लोकमान्य टिळकांचा मोठा सहभाग होता. मराठी व बंगाली
लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत पेटवावी हा विचार घेऊन त्यांनी
राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. कर्झनशाही विरुद्धची टीका, राष्ट्रीय सभेच्या कामासाठी लाल-बाल-पाल
अशी एकत्र आलेली त्रयी, खामगाव-वर्धा-नागपूर-सोलापूर-मुंबई-मद्रास-कोलंबो
असा टिळकांचा मोठा दौरा, कॉंग्रेस
अधिवेशनातील अध्यक्षस्थान, होमरूल लीगची
स्थापना, जहाल लेखांमुळे
देशद्रोहाचे झालेले आरोप, तुरुंगवासाची
शिक्षा या सगळ्यांमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली आणि त्यांची लोकप्रियता
संपूर्ण भारतात वाढत गेली. स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व
बहिष्कार या चतु:सूत्रीच्या साहाय्याने त्यांनी ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण
केले व भारतीय जनतेत संघर्षाची भावना निर्माण केली. ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात, अतिशय प्रतिकूल अशा हवामानात तब्बल ६
वर्षांची (१९०८-१९१४) शिक्षा भोगून परत आल्यानंतरही त्यांनी तेवढ्याच तडफेने
कार्याला सुरुवात केली. राष्ट्रीय भावनेच्या विस्तारासह कॉंग्रेसच्या संघटनात्मक
विस्तारातही त्यांचा शब्दश: ‘सिंहाचा’ वाटा होता. म्हणूनच त्यांचे कार्य म्हणजे
केवळ ‘टिळक यांची कारकीर्द’ नसून,
ते भारताला
स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या जवळ
नेणारे ‘लोकमान्य टिळक युग’ होते.
वरील भाषणाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
अशा या लोकप्रिय
व्यक्तीची सर्वात प्रिय जागा कुठली असेल, तर ती म्हणजे पुण्याजवळचा सिंहगड. एकांताची व चिंतनाची भूक लागली असता
खराखुरा एकांतवास ते सिंहगडावरच अनुभवायचे. तेथेच मनन, चिंतन आणि लेखनही करायचे. लोकमान्यांनी जे
ग्रंथ लिहिले, त्या प्रत्येकात
एकेक गुणविशेष आहे. ’ओरायन’ मध्ये गणिती आणि ज्योतिषविषयक ज्ञान आहे. ’आर्यांचे
वसतिस्थान’ मधून संशोधन व विश्र्लेषण दिसते, आणि मंडालेच्या तुरुंगवासात लिहिलेल्या ‘गीतारहस्यात’ सखोल तात्त्विक
विचार वाचायला मिळतो.
लोकमान्यांच्या
व्यक्तिमत्त्वाची, लेखणीची व
वक्तृत्वाची धार हिंदुस्थानभर पोहोचली. केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहिलेली
त्यांची प्रतिमा प्रत्येक देशभक्ताला ताकद देत राहिली. जनतेने त्यांना ’लोकमान्य’
केले. त्याचबरोबर ते हिंदुस्थानातील (ब्रिटिशविरोधी) अस्वस्थतेचे जनक मानले गेले.
खरे तर राष्ट्राचा अभ्युदय व्हायचा, तर ते राष्ट्र नेहमी अस्वस्थच असायला हवे हे लोकमान्य टिळकांनी
केव्हाच जाणले होते. याच सकारात्मक अस्वस्थतेचा साक्षात्कार आपल्याला त्यांच्या
जीवनकार्यातून होतो.
वरील भाषणाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.