शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

तंत्रज्ञान आणि जग


तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.
त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदिलात दिवस काढले.
चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या.

चालून चपला झीझवणारी हि शेवटची पिढी.
लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी हि पिढी.
लसून कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी हि पिढी.
रानात दाना दाना वेचूनहि चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखून ठेवणारी हि माझ्या आई बापाची पिढी.
ठिगळ लावून जगणारीही हि शेवटची पिढी.
कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात  हे तत्वज्ञान जगणारी हि शेवटची पिढी.

कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजहि नव्हता.
माझ्या पिढीने बंद पडलेले टीवी कधीच भंगारात विकले नाहीत.
बापाचं घड्याळ घालून आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या.
संपलेले सेल फोडून आम्ही खेळगाड्या बनवल्या.
ग्याटर आलेले टायर गल्लीबोळातून पळवत तरुण झालो.
तुटलेल्या क्यासेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रिमची कोळपी बनवून  आमच्यातले काही इंजिनियर झाले.
आमच्या पिढीत मोठ्या भावाकडून वारसा हक्काने वापरून जुन्या झालेल्या वस्तू लहान भावांकडे आल्या.

तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळे केले नाही.
नाती नात्याला आणि माणस माणसांना या नं त्या कारणाने जोडलेली होती.

पण आता मात्र....
गाव पार पार हरवलं.
घरोघरी तंत्रज्ञान घुसलं.

रिचार्ज वाढले talktime संपला.
पिक्सल वाढले जगण्याचा एक्सल कमी झाला.
बघता बघता पिढी फोरजी झाली.
प्रत्येकाचं आयुष्य हि ज्याची त्याची मर्जी झाली.
जगणे मल्टीप्लेक्स झाले.
चौका चौकात पुढार्यांच्या पराक्रमाचे फ्लेक्स आले.

आता तर तो हरवलाय म्हणून पेपरात जाहिरातही देता येत नाही.
कारण हल्ली कळून चुकलंय, गेलेली गोष्ट परत येत नाही,मग ते बालपण असो किंवा गावपण.
या गावाला चूड लावली म्हणून आपण कुणाच्या नावाने खडे फोडायचे ?
या तंत्रज्ञानाच्या ? कारण तो बदलताना आपल्याला गुदगुल्या झाल्या.
तो हरवतानाही आपण होतोच आसपास.

दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही.
गावपण हरवायला नको होतं.