शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

आपली राष्ट्रीय दांभिकता

देशाच्या प्रगतीचे मापन करायचे असेल तर नागरिक काय लायकीचे होते आणि आता काय लायकीचे झाले, या निकषावर करायला हवे.
सातत्याने ढासळत जाणारा नागरिकांचा दर्जा हा राष्ट्रीय काळजीचा विषय असायला हवा.
बोगीतील संडासातल्या टमरेलला साखळी बांधण्याची आयडिया ज्या कुठल्या कल्पक अधिकाऱ्याला सुचली असेल, त्याला शोधून काढून रेल्वे बोर्डाचे चेअरमन करायला हवे. भारतीय नागरिकांचे त्याचे आकलन हे श्रेष्ठ दर्जाचे आहे.
‘तेजस’ या आधुनिक, वेगवान रेल्वेत
सुंदर बाकडी, एलईडी, छान वातानुकूलित व्यवस्था आणि असे बरेच काही असावे, ही कल्पना ज्याने मांडली त्याचे भारतीय नागरिकांचे आकलन कमी आहे, या कारणावरुन निलंबनच करायला हवे.
हातगाडीवर बसवून न्यायच्या लायकीच्या लोकांना त्याने पालखीत बसवून रुबाबात न्यायचे स्वप्न पाहण्याचा प्रमाद केला आहे.
बाळासाहेब ठाकरे एक किस्सा त्यांच्या शैलीत नेहमी सांगायचे. ‘लोक इथल्या हॉटेलमधले चमचे चोरुन नेतात. अगदी रोज नेतात. अरे, चोरी करायची ठरवलेच आहेस तर निदान मोठा दरोडा तरी टाक. चमचे काय चोरतोस.?’
एका श्रेष्ठ भारतीय नागरिकाने, एका  प्राणी संग्रहालयात, पिंजर्यातील माकड जाळीजवळ आल्यावर त्याच्या अंगाला खाजखुजली लावली होती आणि माकड खाजवून खाजवून वेडेपिसे झाल्याचा व्हिडीओ फेसबुकवर टाकला होता.
रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे, गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे,
ऐतिहासिक इमारतींवर स्वताचे आणि स्वताच्या टिनपाट मत्रिणीचे नाव कोरणारे,
कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करुन पाणी टाकता निघून जाणारे,
शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे,
सार्वजनिक ऊत्सवात, लोकांकडून जमविलेल्या  वर्गणीतून अवास्तव खर्चाच्या नावाखाली कमिशन म्हणून आपली तुंबडी भरणारे,
सार्वजनिक गणेशोत्सव  बाप्पाच्या पुढ्यातील  फुले प्रसाद आपल्या बापाचा समजून घरातील फ्रिजची कपाटं भरणारे बाप्पाचे ऊत्साही कार्यकर्ते, नेतेपणाची हौस भागवणारे बिनबुडाचे  महाभाग,
रस्त्यावरची बाकडी, रोड डिव्हायडर, फरशा चोरुन नेऊन विकणारे, एसटी किंवा रेल्वेचे सीट कव्हर सहज विरंगुळा म्हणून फाडणारे. हीच आपली ओळख आहे.
 या ओळखीबद्दल काय बोलणार?
वर्तमान लाजीरवाणा आणि भिकारडा असला की गतकाळातल्या फुशारक्या मारण्याशिवाय आपल्या हातात दुसरे काय उरते.?
सरकार बदलून खूप प्रयोग करुन झाले. त्याने काही फरक पडत नाही.
आता जनताच बदलायला पाहिजे.
या देशात जर सुधारणा घडवून आणायच्या असतील, तर आपले
नागरिक देशातून हाकलवून देऊन
बाहेरच्या देशांतले चकचकीत लोक
आयात करणे अतिशय आवश्यक आहे.
आणि तसे जर करायचे नसेल, आणि आपल्याच नागरिकांना जाब विचारायचा असेल तर मग मागच्या 70 वर्षांत तुम्ही अजूनही टुकार नागरिकच का आहात, असा प्रश्न विचारायला हवा.!
सरकार काय, मतदानाने कधीही बदलता येईल. जे कधीच बदलत नाहीत आणि दिवसेंदिवस अधिकच भिकार दर्जाचे बनत चाललेत, त्या नागरिकांचे काय करायचे.?