शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

पद्मश्री अण्णा उर्फ किसन बाबूराव हजारे



आपले जन्मगाव राळेगणसिध्दीला आदर्श गाव करून ग्रामीण विकासाचे मूर्तीमंत उदाहरण घालून देणाऱ्या आणि माहितीचा अधिकार आणि लोकपाल विधेयकासाठी जीवाचं रान करणाऱ्या अण्णांचा अर्थातच किसन बाबूराव हजारे यांचा आज जन्मदिवस. आज अण्णांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक गावे आदर्श गावे झाली आहेत. अण्णांनी दिलेल्या मार्गाने देशभरात ग्रामसमृध्दीचा प्रयत्न निरंतर सुरु झाला आहे.
अण्णा हजारे यांचा जन्म 15 जून 1937 मध्ये अहमदनगर शहराजवळच्या भिंगार भागात झाला. त्यांच्या पूर्वजांचे गाव राळेगणसिध्दी हेच आहे. पण अण्णांचे आजोबा कुटूंबाच्या उदर निर्वाहासाठी भिंगार येथे रहात होते. अण्णा यांचे आजोबा इंग्रजांच्या सैन्यात जमादार होते. त्यांचे वडीलकाका, आत्या आणि इतर सारे जवळचे नातेवाईक भिंगारमध्ये रहात होते. बाबूराव हजारे आणि लक्ष्मीबाई यांचे अण्णा पहिले अपत्य होते. आईवडील धार्मिक वृत्तीचे असल्याने ईश्वरावर त्यांचा अतूट विश्वास होता. बाबूराव आणि लक्ष्मीबाई यांनी पहिल्याच अपत्याचे नाव किसन असे ठेवले. किसन सर्वांचे लाडके होते. सारेच त्यांचे लाड करत सारे लहानग्या किसनला खेळवत असत.
लहानपणी अण्णांना खेळण्याचा छंद होता. त्यांना पतंग उडवायला आवडे. अण्णांना आकाशात कबुतरे उडविण्याचाही छंद होता. त्यातून त्यांनी कबूतरेही पाळली होती. अण्णांच्या जीवनावर त्यांची आई लक्ष्मीबाई आणि वडील बाबूराव यांचा मोठा प्रभाव आहे. अर्थातच जर अण्णा आज या वयातही इतके मजबूत आहेत तर ते त्यांच्या आई-वडीलांच्या संस्कारामुळेच आणि चांगल्या गुणांमुळेच.
1962 मध्ये शारीरिक क्षमता चाचणीत बसत नसतानाही 25 वर्षीय अण्णांची सैन्यात निवड झाली. औरंगाबादेत सैनिकी प्रशिक्षण घेतल्यानंतर 1963 पासून सैन्यात वाहनचालक म्हणून अण्णांनी कारकीर्दीला सुरुवात केली. 1965 च्या भारत-पाक युद्धात अण्णा खेमकरन सीमेवर तैनात होते. 12 नोव्हेंबर 1965 रोजी पाकिस्तानने भारतीय तळावर हवाई हल्ले सुरू केले. त्यात अण्णांचे सर्व सहकारी मारले गेले. सैन्याला रसद पुरविणारा ट्रक चालविणाºया अण्णांच्या कपाळाला एक गोळी चाटून गेली, पण फलटणीतील केवळ अण्णा बचावले. या घटनेने त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. वयाच्या 38 व्या वर्षी निवृत्तीवेतनासाठी पात्र होताच त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली.
लष्कर सोडल्यावर 1975 मध्ये राळेगणसिद्धीला परतल्यानंतर संत यादवबाबा मंदिराच्या एका छोट्या खोलीत राहून अण्णांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले. गावातच असलेल्या आपल्या घरी अण्णा तेव्हापासून कधीही गेले नाहीत. जवळजवळ कायमच्या दुष्काळी प्रदेशात असलेल्या या दुर्लक्षित गावात त्यावेळी गरिबी आणि निराशेचा सुकाळ होता. अण्णांनी ग्रामस्थांसह अनेक दशके अथक प्रयत् करून गावाचा कायापालट केला. आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी गावातील परिस्थिती सुधारली. तंत्रज्ञान किंवा औद्योगिकीकरणाचा आधार घेता केवळ अतोनात कष्ट आणि सहकार यांवर त्यानी गावातील गरिबी दूर करण्यात यश मिळवले.
अण्णांनी गावातील युवकांना संघटित केले. तरुण मंडळाची स्थापना केली. संत यादवबाबा मंदिरात सर्वांना दारू पिण्याची शपथ देण्यात आली. मद्यपींना मंदिराच्या खांबाला बांधून तरुणांनी फटकेही मारले. व्यसनाधी राळेगण व्यसनमुक्त झाले. गरजू गावक-यांच्या मदतीसाठी 1980 मध्ये अण्णांनी यादवबाबा मंदिरातच अन्नधान्य बँक सुरू केली. श्रीमंत शेतकऱ्यांनी दान केलेले धान्य ते गरजूंना द्यायचे.
राळेगणसिद्धीला सुजलाम् करण्यासाठी अण्णांच्या पुढाकारातून गावक-यांनी श्रमदान केले छोटी तळी आणि पाझर तलाव बांधले. 3 लाखांहून अधिक झाडे लावली. त्यामुळे पाणीटंचाई संपली. 1975 मध्ये केवळ 70 एकर जमीन कशीबशी सिंचनाखाली होती. अण्णांच्या प्रयत्नातून 2500 एकर जमीन भिजू लागली. हे प्रयोग पुढे महाराष्ट्रभर राबविण्यात आले. गावाच्या विकासाचे अधिकार ग्रामसभेला देण्याच्या मागणीसाठी 1998 ते 2006 या काळात अण्णांनी राज्यभर जनजागृती मोहीम राबविली. सरकारला ग्राम सभा कायद्यात सुधारणा कराव्या लागल्या.
सन 2000 मध्ये माहिती अधिकाराच्या कायद्यासाठी अण्णांनी राज्यभर लोकचळवळ सुरू केली. त्यामुळे 2003 मध्ये महाराष्ट्र सरकारला माहिती अधिकाराचा कायदा करावा लागला. जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी 5 एप्रिल 2011 पासून जंतरमंतरवर बेमुदत उपोषण केले. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर 9 एप्रिल रोजी त्यांनी उपोषण सोडले.

पुरस्कार
2008 - जागतिक बँकेचा जित गिल स्मृती पुरस्कार
2015 - गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठाची मानद डॉक्टरेट
2003 - जर्मनीचा राष्ट्रीय पारदर्शकता एकात्मता पुरस्कार
2000 - सेंट पॉल मित्तल राष्ट्रीय पुरस्कार
1998 - रोटरी मानव सेवा राष्ट्रीय पुरस्कार
1998 - केअर इंटरनॅशनल अवॉर्ड
1997 - महावीर पुरस्कार
1996 - शिरोमणी पुरस्कार
1994 - विवेकानंद सेवा पुरस्कार
1992 - पद्मभूषण
1990 - पद्मश्री (सरकारला परत केला)
1989 - महाराष्ट्र सरकारचा कृषिभूषण पुरस्कार
1988 - मॅन ऑफ इयर
1986 - प्रियदर्शिनी इंदिरा वृक्षमित्र पुरस्कार

Lets Up Magazine