शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

वाचनात आलेला एक अप्रतिम लेख


साल 1988
देश : अर्मेनिया.
सॅम्युएल व डॅनियल या दाम्पत्याने आपल्या आरमंड या मुलाला शाळेला पाठविले. पाठविताना त्याने आरमंडच्या डोळ्यात पाहून सांगितले "तुझा आजचा शाळेचा दिवस चांगला जावो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काहीही होऊ दे मी नेहमी तुझ्यासाठी हजर आहे."
त्यादोघांनी आरमंडला मिठी मारली व आरमंडने शाळेच्या दिशेने धूम ठोकली. आरमंड शाळेत गेला आणी अवघ्या काही तासांत भूकंपाच्या एका तीव्र झटक्याने संपूर्ण परिसर हादरून गेला.
त्या संपूर्ण गोंधळात सॅम्युएल व डॅनियल यांनी आरमंडचे काय झाले आहे याची माहिती उपलब्ध होते का ते पहिले पण, त्यांना ती उपलब्ध होऊ शकली नाही. रेडिओवर सांगितले जात होते की हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. सॅम्युएलने क्षणाचाही विलंब न करता आपला कोट उचलला व शाळेच्या दिशेने निघाला. जेव्हा तो शाळेच्या आवारात पोहोचला तेव्हा त्याने जे काही दृश्य पाहिले त्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. आरमंडची शाळा एका मातीच्या ढिगाऱ्यात परिवर्तित झाली होती व सर्व पालक बाजूला उभे राहून रडत होते.
सॅम्युएलने ती जागा शोधली जिथे आरमंडचा वर्ग होता व तिथे त्या मातीच्या ढिगाऱ्यात मोडून पडलेली एक तुळई ओढायला सुरवात केली. त्यानंतर त्याने एक दगड उचलला व बाजूला काढून ठेवला, त्यानंतर पुन्हा एक दगड उचलला.
हे पाहताच तेथे उभा असलेल्या एका पालकाने विचारले "हे काय करतो आहेस?"
"मुलासाठी खोदतोय," सॅम्युएल उत्तरला.
तो पालक म्हणाला "अरे तू परिस्थिती आणखीनच खराब करीत आहेस, ही बिल्डिंग अस्थिर झाली आहे." असे म्हणून त्याने सॅम्युएलला तिथून बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला.
सॅम्युएलने प्रतिकार नाही केला तो फक्त आपले काम करीत राहिला. जसा जसा वेळ जात होता तसा तसा एक एक पालक तिथून निघून गेला.त्यानंतरही एका कामगाराने सॅम्युएलला त्या ढिगाऱ्यातून बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला. सॅम्युएलने त्याच्याकडे एक आश्वासक कटाक्ष टाकला आणी विचारले "मदत नाही करणार मला?" तो कामगार काहीही उत्तर न देता निघून गेला आणि सॅम्युएल खोदतच राहिला.
संपूर्ण रात्र व नंतर पुढील दिवसभर सॅम्युएल खोदतच राहिला. पालकांनी आपल्या मुलांचे फोटो त्या अवशेषांच्या ठिकाणी ठेवले व त्यावर फुले वाहिली. पण, सॅम्युएल काम करीतच राहिला. आणि जेव्हा पुन्हा त्याने एक तुळई उचलली व वाटेतून बाजूला सारली तेव्हा त्याने एक अस्पष्ट रडण्याचा आवाज ऐकला. "वाचवा ! वाचवा !" सॅम्युएलने हळुवारपणे कानोसा घेतला पण काही ऐकू आले नाही. तितक्यात एक कापरा आवाज आला "पापा?"
सॅम्युएल जलदगतीने खोदू लागला. अखेर त्याला आरमंड दिसला. "पोरा, ये बाहेर." एक सुस्कारा टाकत सॅम्युएल बोलला.
"नाही," आरमंड बोलला. "आधी इतर सर्व मुले बाहेर येऊद्यात, कारण मला माहित आहे तुम्ही मला नक्की बाहेर काढाल."
एक एक करीत सर्व मुले बाहेर आली व सरतेशेवटी आरमंड बाहेर आला.
सॅम्युएलने आरमंडला कडकडून मिठी मारली. तेव्हा आरमंड म्हणाला, "मी सगळ्या मुलांना सांगितले आहे, काळजी करू नका. कारण, तुम्हीच मला सांगितलेले आहे, काहीही होऊ दे, मी नेहमी तुझ्यासाठी हजर आहे."
त्यादिवशी एकूण 14 मुलांना वाचविण्यात यश आले. कारण,
एक बाप विश्वासू होता.
आपल्या मुलांवर प्रेम करा !
त्यांच्या आपल्यावरील विश्वासामुळे एक पहाड सुद्धा हलू शकतो !!