शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

पैसा वसे मनी - मुदत ठेव

भारतातील सर्वात अधिक लोकांचा सर्वात जास्त विश्वास असणारा आर्थिक नियोजनाचा पर्याय म्हणजे मुदत ठेव (एफडी - फिक्स डिपॉझिट) हा होय. सर्वात सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवण्याचा मार्ग म्हणजे मुदत ठेव हे गणित भारतीय लोकांच्या डोक्यात ठाण मांडून बसले आहे. मात्र एफडी किती सुरक्षित आहे याबाबत किती ज्ञान लोकांकडे आहे, हा संशोधनाचा विषय आहे. आर्थिक नियजोनात एफडीला महत्त्व आहे, मात्र ते सध्या जेवढ्या प्रमाणात दिले जाते त्याहून कमी आहे हे निश्चित आहे. काही लोकांचे संपूर्ण आर्थिक नियोजन हे केवळ एफडीवर अवलंबवून आहे.

सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींनी तेथील गुंतवणूक काढून एफडीत पैसे ठेवायला सुरवात केल्याने एफडीत पैसे गुंतवणारांची संख्या वाढतच गेली. कारण सोन्याच्या दरात गेल्या काही वर्षांपासून वाढ झालेली नाही. रिझर्व बँकेने काढलेल्या आदेशानुसार प्रत्येक भारतीयाचे सर्व बँकातील मिळून केवळ लाख रुपयांपर्यंतची एफडी रक्कम सुरक्षित आहे, याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. मात्र हा पर्याय बँक बुडाल्यानंतरचा आहे. बहुतांशी राष्ट्रीयकृत बँकेतील मुदत ठेवी ९९ टक्के सुरक्षित मानायला काहीच हरकत नाही.

खात्रीशीर सुरक्षित असा पर्याय देणारा हा मार्ग असल्याने ज्येष्ठ नागरिक या पर्यायाचा वापर करताना दिसतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर इतरांपेक्षा थोडे जास्त व्याज बँका देत असतात, कारण ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवी बंद करत नाहीत. त्यांना दरमहिन्याला ठराविक रक्कम व्याजाच्या स्वरुपात मिळावी अशी अपेक्षा असते, त्यामुळे या ठेवी दीर्घकाळ टिकतात. असे बँकाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे या ठेवींच्या रुपात ज्येष्ठ नागरिकांनी ठेवलेला पैसा हा दीर्घकाळ वापरायला मिळत असतो, म्हणून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना ठेवी ठेवण्यासाठी आकर्षित करण्यासाठी बँका त्यांना इतरांपेक्षा जास्त व्याज देतात.

लहान रकमेच्या मुदत ठेवी करायला पाहिजेत, मात्र त्यातील गुंतवणूकीचे प्रमाणा कमी असावे. ज्यांचे वय झाले आहे, काम करणे किंवा आर्थिक व्यवहार सांभाळणे होत नाही, अशा लोकांनी मुदत ठेवीचे प्रमाण वाढवायला हवे. मात्र जे तरुण आहेत, त्यांनी मोठ्या रकमेच्या मुदत ठेवी कमी प्रमाणात कराव्यात. एका आकडेवारीनुसार भारतात लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मुदत ठेवीमध्ये गुंतवलेली आहे. मुदत ठेव सुरक्षित असली तरी त्यातून मिळणारा परतावा हा महागाई दरापेक्षा कमी असतो, त्यामुळे आपल्या गुंतवणुकीचे आर्थिक मूल्य दिवसेंदिवस घटत जाते.

याचे उदाहरण पाहू या. ज्यावेळी मुदत ठेवीचे (एफडीचे) दर हे ०९ टक्के होते, तेव्हा महागाई दर १० टक्के होता. म्हणजे १०० रुपयात जी वस्तू मिळत होती ती वस्तू एक वर्षानंतर ११० रुपयांत मिळायची. मात्र १०० रुपये मुदत ठेवीत ठेवले तर त्याचे एक वर्षानंतर १०९ रुपये व्हायचे. त्यामुळे महागाई दरानुसार टक्के तोटा सहन करावा लागायचा. आता महागाई दर कमी झालेत, त्याच प्रमाणात मुदत ठेवीवरचे व्याजदर सुध्दा कमी झालेले आहेत. येणाऱ्या काळात मुदत ठेवीवरचे व्याजदर अजून कमी होत जातील. तेव्हा मुदत ठेवीत गुंतवलेल्या पैशांचे अवमूल्यन होत जाईल. त्या पैशाचे मूल्य कमी होत जाईल.


सुरक्षा, परतावा तरलता (Security, Returns and Liquidity) या त्रिसूत्रीचा विचार केल्यास सुरक्षा तरलता अतिशय चांगली असल्याने मुदत ठेवीमध्ये ठराविक रक्कम गुंतवली पाहिजे हे सुध्दा महत्त्वाचे आहे. भारतीय विचारसरणीनुसार गुंतवलेल्या पैशात जास्त वाढ नाही झाली तर चालेल, मात्र गुंतवलेल्या पैशात कोणत्याही परिस्थितीत घट व्हायला नको अशी भारतीयांची धारणा असते. त्यामुळे मुदत ठेवीत काही पैसे असलेले केव्हाही चांगलेच ठरते. त्याचा वापर वेळी अवेळी उद्भवलेल्या महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी होऊ शकतो. याउलट जर आपली थोडीसुध्दा गुंतवणूक मुदत ठेवीत / एफडीत नसेल तर आपल्या मुख्य गुंवतणुकांमधील (ज्या चांगला परतावा / returns देणार असतात) पैशाला कात्री लावण्याची वेळ आपल्यावर येते. म्हणून आर्थिक नियोजनातील मोठ्या स्वप्नांच्या सुरक्षेसाठी मुदत ठेवीमध्ये ठराविक रक्कम जरुर ठेवा. धन्यवाद.