शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

कविता 4 - मास्तर

मास्तर दमला असाल तुम्ही
शतकामागून शतकं
चालतचं राहिलात तुम्ही ...

तुमच्या पायातील वेदना भेगाळून
तिचं आता खिंडार झालयं
तुम्ही पार केल्यात
असंख्य अडाणी वाटा
अन् अज्ञानात पेरीत आलात
ज्ञानाच्या असंख्य लाटा...

तुम्ही मार्क्स शिकविला
तुम्ही ज्ञानोबा शिकविला
तुकाराम, ज्योतीबा आणि
सान्यांचा शामही
मास्तर तुम्ही शिकविलात

ज्योतिबाची ज्योत
सावित्रीच्या हातात देऊन
असंख्य अबलांना
सबलतेचा मार्ग शिकविला

पण मास्तर .....
काळाच्या ओघात
तुम्ही दिसेनासे झालात
तुमच्या काळ्या कोटासहीत......

मास्तर दुनिया बघा कुठे चाललीये
मार्क्सवाद उलटा टांगून
रंगीरंगीबेरंगी माॅल सजलेत
अंधाराला सजवत.....

मनावरची धूळ काढणारी
शामची आई
आता रस्त्यावरचया धुळीलाही घाबरत नाही. ...

मास्तर आईची भाकरी
चूलीतच राहिली हो...
बर्गर पिझ्झात आजची पोरं
पुरती वाहीलीत......

छत्रपतींचा एकनिष्ठ सेवकही
आता झेंडा हातात घेऊन
'सैराट'वर झिंगाट झालाय

काय होणार मास्तर या पिढीचं ?
सांगा या पोरांना
बर्गर पिझ्झा हट
म्हणजे आयुष्यात घट
त्याहून बरा लसणीचा ठेचा
अन् भाकरीची लड

मास्तर तुम्ही या अन सांगा यांना बुद्धीझम, फेमिनिझम
सोशल साइटवर फिरण्यापेक्षा
शिका सोशालिझम.....

मास्तर, माणसं माणसांना विसरत चाललीयेत हो...
हातात जेव्हा पासून आलाय फोन
पडतात झडतात तरी
सावरायला असतात कॅफेझोन

शिकवा त्यांना मास्तर
लवकर उठा लवकर निजा
मोबाईलच्या नाही तर
आयुष्याच्या रेंजसाठी झिजा

मास्तर त्यांना हेही शिकवा
मातीचेच असतात आपले पाय
सुखदुःखासाठी कधीतरी
नातीसुदधा असतात वायफाय

शिकवा त्यांना गुड मॉर्निंग
 व्हॉट्स अॅप वर करण्यापेक्षा
मोहक हसायला शिका
दुःखाच्या आभाळाला
शब्दात टाचायला शिका

मास्तर याल ना परतून? ....
तुमची गरज आहे आजच्या पिढीला
या बेफाम दुनियेला लगाम घालण्यासाठी
मास्तर तुम्ही याल ना?
तुमचा तो काळा कोट
आणि पांढरी टोपी घालून. ..

         (डॉ. रोहिणी वळसे पाटील)

वर दिलेली कविता पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेलया बटणावर क्लिक करा.