शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे


रोज शाळा सुटल्यावर भूक लागल्यामुळे चिन्मय धावतच घरी यायचा. त्याची आई रोज त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करायची. कधी इडली, ढोकळा, थालिपीठ, नूडल्स अगदी रोज काहीतरी वेगळे असायचेच. शाळेतल्या मित्रांना त्याचा हेवा वाटायचा. एके दिवशी घरी आल्यावर आई झोपलेली होती. तो घाईने आई जवळ गेला. आईला ताप आला होता. त्याला पाहून क्षीण आवाजात आई म्हणाली, " चिनू बेटा, मला ताप आल्यामुळे अजिबात उठवले जात नाही आहे. मी तुझ्यासाठी काही खायला करु शकले नाही. आजचा दिवस तू सकाळचीच पोळी-भाजी खा आणि दूध पी". हे ऐकल्यावर चिनूला खूपच राग आला. "हे काय डब्याही तेच आणि आताही तेच ? मी नाही काही खात जा" चिन्मय धूसफूसत म्हणाला. शेवटी काही खाताच तो चिडून खेळायला गेला.
आईला बरे नाही म्हणून संध्याकाळी बाबा स्वयंपाक करत होते. "चिनू आज तुझी मला मदत हवी आहे. मटार सोलून दे बरं", बाबा पोळया लाटता लाटता म्हणाले. नाखुषीनेच चिनूने मटार सोलायला घेतले. त्यानंतर तांदूळ निवडले. "बापरे किती वेळ लागतो हे करायला." चिनू वैतागला. बाबाही बराच वेळापासून स्वयंपाकघरात होते पण त्याच्या फक्त पोळया आणि भाजी करुन झाली होती. अजून कुकर लावायचा बाकी होता. "हो ना रे चिनू, आपण इतका वेळ स्वयंपाकघरात आहोत पण दोनच पदार्थ करु शकलो. आई रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ इतके पदार्थ कसे करत असेल ? ते सुध्दा आपली अजिबातच मदत नसतांना?"
बाबाच्या ह्या प्रश्नाने चिनूला आपले संध्याकाळचे वागणे आठवले. ताप आलेला असतांनाही आपण आईशी किती वाईट बोललो हे आठवून त्याला खूप वाईट वाटले. धावतच तो आईच्या खोलीत गेला. आईच्या जवळ जाऊन तिला म्हणाला , "आई मला माफ कर. तू आमच्यासाठी किती कष्ट घेतेस. मी मात्र तुला बर नसतांनाही खायला करायचा हटट केला. कधी कधी तर तू प्रेमाने कलेले, मी मात्र आवडत नाही म्हणून सरळ टाकून देतो. माफ कर मला आई".

चिन्यमचे हे बोलणे ऐकून आईने त्याला जवळ घेतले. बाबाही समाधानाने स्वयंपाकघरात जेवणाची पान घ्यायला वळला.
तात्पर्यं:-प्रत्येककाच्या कार्याचा आदर करावा.