शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

चिनी मालावर बहिष्कार टाकताय ?

(श्रीकांत आव्हाड)
> तुम्ही ज्या मोबाईलवरून चिनी मालाच्या बहिष्काराचे आवाहन करत आहात त्याचे निम्म्यापेक्षा जास्त स्पेअर पार्ट चिनी बनावटीचे आहेत, किंवा तो संपूर्ण फोनच चिनी बनावटीचा आहे.
> तुम्ही जे कॉम्प्युटर वापरताय त्याचे निम्मेअधिक स्पेअर पार्टस चिनी बनावटीचे आहेत. 
> जगातील सर्व मोठे ब्रॅण्ड्स चीन मध्ये असेम्बल होतात.
> तुमच्या लॅपटॉप मधले अर्ध्यापेक्षा जास्त पार्टस चिनी आहेत. 
> तुम्ही वापरत असलेल्या वाहनाचे कितीतरी पार्टस चीन मधून आयात केलेले आहेत. 
> तुमच्या घरात फ्रिज आहे ? मग त्याचे पार्टस चीन मध्ये बनलेले आहेत हे लक्षात ठेवा. 
> तुम्ही वापरात असलेली साबण, पावडर, शाम्पू, सेंट, डियो, पावडर यासाठी लागणारे कितीतरी केमिकल्स चीनमधून आयात होतात. 
> तुमच्या घरात असणाऱ्या प्लास्टिक वस्तूंपैकी कितीतरी वस्तू चीनमधून आयात केलेल्या आहेत, किंवा त्याचा कच्चा माल चीनमधून आणलेला आहे. 
> तुम्ही बाहेर एखाद्या शोरूम मधून फर्निचर विकत घेतलेलं आहे ? मग तेसुद्धा चीन मधून आयात केले असण्याची ८०% शक्यता आहे. 
> तुमच्या घरात सोलर वॉटर हिटर आहे? मग तो एक तर पूर्णपणे चीनमधून आयात केलेला आहे किंवा किमान त्याच्या ट्यूब चिनी बनावटीच्या आहेत. 
> तुम्ही जी सौंदर्यप्रसाधने वापरता ती सुद्धा बरीचशी चीनमधून आणलेली आहेत. 
> तुम्हाला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या शेकडो, हजारो वस्तूची या एक तर चिनी बनावटीच्या आहेत किंवा त्यांचा कच्चा माल चीनमधून आयात केलेला आहे. 
> ज्या वस्तू भारतात बनतात त्या वस्तूंसाठी लागणारा ४०-५०% पेक्षा जास्त कच्चा माल चीनमधून आयात केला जातो. 
> तुम्ही पूर्णपणे चिनी बनावटीच्या वस्तूंनी घेरलेले आहात.
म्हणजेच चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे मेसेज पाठवताना तुम्ही स्वतःशीच बेईमान असता. तुम्हाला माहित असतं कि तुम्ही चिनी मालाचा बहिष्कार नाही करू शकत तरीही दुसऱ्यांना उपदेशाचे ढोस पाजत असता.
नुसतं फटाके आणि मोबाईल वर बहिष्कार म्हणजे देशभक्ती अशी जी काही भावना तुमच्या डोक्यात आहे ना ती निव्वळ फसवी आहे.... आमच्यासाठी नाही तुमच्यासाठीच. कारण तुम्हाला वास्तवच माहित नाही, तुम्ही स्वतःलाच फसवत आहात, किंवा तुम्ही फक्त सोशल मीडियावर बोलणारे बोलबच्चन आहात.
कोणत्याही देशाच्या वस्तूवर बहिष्कार घालण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यापेक्षा जास्त चांगल्या आणि स्वस्त वस्तू बनवल्या तर त्यावर आपोआपच बहिष्कार पडेल हे आपल्या लक्षातच येत नाही किंवा आपल्या इतका खोलवर विचारच करायचा नाहीये. उथळ पाण्याला खळखळाट फार अशी आपली अवस्था झाली आहे. पण खरी ताकद खोल पाण्यातच असते हे आपण लक्षातच घेत नाही, ते शांत असलं तरी त्याच्या अंतररंगात खूप काही दडलेलं असत. शांत राहून जे करता येत ते उथळ बडबड करून कधीच सध्या होत नाही हे कधी लक्षात घेणार आपण?
आता वास्तवात या... 
कौतुक आणि वास्तव यातला फरक ज्याला कळतो त्यानेच खालील माहिती वाचावी नाहीतर इथेच थांबून घ्यावं.
कधी स्वतःला विचारलंय ? 
इतका चिनी माल आपल्या देशात का बरं येतो ? फक्त आपल्याच देशात नाही तर जगात सर्वत्रच हा चिनी मालाचा धुमाकूळ का चालू आहे ?
ज्या वस्तू चीन बनवू शकत त्या आपण सुद्धा बनवू शकतो कि मग तरीही चीन ची गरज का पडावी ?
कारण आपण बनवत असलेल्या वस्तूंची प्रोडक्शन किंमत चिनी वस्तूंच्या च्या विक्री किमतीपेक्षा सुद्धा जास्त आहे. एखादी वस्तू दोन जण सारखीच बनवत असतील तर त्यापैकी जी स्वस्त असेल त्यामागेच ग्राहकांची झुंबड उडणार हा मार्केट हा नियमच आहे. साहजिकच आपल्याला कुणी दारातही उभं करत नाही.
का बरं चिनी मालाची प्रोडक्शन कॉस्ट इतकी कमी राहत असेल ? ते फक्त खराब माल वापरत असते तर Apple Iphone सारखे जगविख्यात मोबाईल चे पार्टस चीन मध्ये बनलेच नसते.
चीन ची एक खासियत आहे. तुम्हाला काय हवंय ते सांगा आम्ही देऊ. ते नाही कशालाच म्हणत नाही.
"कोई भी धंदा छोटा या बडा नाही होता 
और धंदे से बडा कोई धरम नाही होता" 
हे वाक्य सर्वार्थाने चीनलाच लागू पडतं.
तुम्हाला क्वालिटी पाहिजे ? मिळेल.... 
तुम्हाला स्वस्त पाहिजे ? ते सुद्धा मिळेल....
अगदी हूबेहून I-Phone सारखे मोबाईल तिथे २ हजारात सुद्धा मिळतात. आणि खऱ्या I-Phone चे पार्टस सुद्धा तिथेच बनतात. म्हणजेच मेड इन चायना हे काही आपल्याला वाटतं तसं बकवास नक्कीच नाही. चिनी उत्पादन हे आज जगात सर्वोत्तम पातळीवर आहे. जगातील सर्वोत्तम आणि मोठ्या कंपन्यांच्या रांगेत चीनमधील कितीतरी कंपन्या आहेत.
कोणत्याही उद्योजकाला हेवा वाटावा अशी चीन ची इंडस्ट्री आहे. 
आणि कोणत्याही उद्योजकाने शिकावं अशीही हि इंडस्ट्री आहे.
चीन आज जगातील सर्व वस्तू बनवू शकतं, ते आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी स्वस्त देऊ शकतं, ते फक्त आपल्याच दशेत नाही जगात सर्वत्र किमतीच्या जोरावर धुमाकूळ घालत आहेत, कशामुळे ? या प्रश्नच उत्तर शोधा... चीन ला मागे टाकण्याचं उत्तर सापडेल.
> चीनचा मुख्य भर आहे तो वस्तू स्वस्त देण्यावर. 
> यासाठी ते भयंकर कॉस्ट कटिंग करतात. 
> अगदी त्यांच्या कंपन्या टी ब्रेक च्या १५ मिनिटात सुद्धा पूर्णपणे शट-डाऊन केलेल्या असतात. 
> कामगार पूर्ण क्षमतेने काम करतात किंवा त्यांच्याकडून करवून घेतले जाते, पण कामगारांकडून जास्तीत जास्त आऊटपुट मिळेल यासाठी कंपन्या प्रयत्नशील असतात. कामगारांवर होणारा खर्च हा सर्वात जास्त असतो. त्यामुळे या खर्चावर नियंत्रण आवश्यक असते. म्हणूनच कामगारांकडून जास्तीत काम करून घेणे हे प्रत्येक कंपनीचे पहिले लक्ष्य असते. 
> अगदी काम चालू असताना कामगार कुणाशी गप्पा मारत नाही कि थोडासुद्धा टाईमपास करत नाहीत. 
> सरकार निर्यातीवर भरपूर सवलत देत असतं. निर्यातीसाठी मोठ्या सुविधा उपलब्ध असतात. 
> एक कंपनी एकाच वस्तूचे उत्पादन करण्यावर भर देते. पण ते खूप मोठ्या प्रमाणावर असते. याला मास प्रोडक्शन म्हटले जाते. 
> तसेच खर्चावर खूप कात्री लावली जाते. पगार, इतर खर्च, इलेक्ट्रिसिटी चा खर्च, यासारख्या खर्चावर भरपूर नियंत्रण असते. 
> अनावश्यक पैसे कुठेही खर्च होणार नाही यासाठी चिनी कंपन्या कायम प्रयत्नशील असतात. 
> कॉस्ट कटिंग करताना अगदी ०.००१ % चा सुद्धा विचार केला जातो. 
> मशिनरींवर दररोज नवनवीन संशोधन होत असते ज्यामुळे उत्पादनाचा वेग वाढवता येईल. 
> या मोठमोठ्या इंडस्ट्रीजच्या खालोखाल लघुद्योगांचे मोठे जाळे विणलेले आहे. ज्यामुळे मोठ्या कंपन्यांना कच्चा माल स्थानिक पातळीवर मिळतो. 
> एकाच ठिकाणी सर्व काही, यामुळे वाहतूक खर्चासारखे अनावश्यक वाढणारे खर्च कमी होतात. 
> अशा वेगवेगळ्या मार्गाने प्रोडक्शन कोस्ट कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. फक्त मोठ्याच नाही तर लहान लहान कंपन्यांमध्ये सुद्धा याच प्रकारे कॉस्ट कटिंग केली जाते. कारण लहान कंपन्यांकडूनच मोठ्या कंपन्यांना माल जात असतो. लहान कंपन्यांची प्रोडक्शन कॉस्ट कमी म्हणजे मोठ्या कंपन्यांना सुद्धा कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य असते. त्यामुळे कॉस्ट कटिंग हि ग्राउंड लेव्हल च्या कंपन्यांपासूनच सुरु होते.
प्रत्येकामधून अर्धा पाव टक्का खर्च वाचला तरी एकूण उत्पादन खर्चावर खूप मोठा फरक पडतरो. आणि हाच फरक त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सहाय्य्यभुत ठरतो.
जे काही करताल ते मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने करा... 
कमी वेळात, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन हाच चिनी कंपन्यांच्या यशाचा गाभा आहे.
आता आपल्याकडे काय परिस्थिती आहे ?
> सकाळची नऊ ची शिफ्ट असेल तर कामगार बरोब्बर ९ वाजता कंपनीत येतात मग त्यानंतर एंट्री करणे, हात धुणे, पाणी पिणे यासारख्या क्षुल्लक कामांसाठी वेळ वाया घालवून ९-१५ ला काम सुरु होते. यानंतर दिवसभरात पाणी पिणे, बाथरूम ला जाणे यासारख्या कारणाखाली एखाद तास वाया घातला जातो. यात गप्पा वेगळ्या. 
> संध्याकाळी पाच ला सुट्टी असेल तर पंधरा मिनिटे आधीपासूनच कामात टंगळमंगळ सुरु झालेली असते. 
> या सगळ्या कौशल्यामुळे कामगारांकडून दिवसातले २ तास वायाच गेलेले असतात. म्हणजे उत्पादन खर्चावर परिणाम करणारा सगळ्यात मोठा भागच आपलं काम चोख बजावत नाहीये. 
> कामगार वर्गाकडून काम करताना कंपनीशी कोणतीही अटॅचमेंट नसते, फक्त पर्याय नाही म्हणून काम करायचे अशा मानसिकतेमध्ये असताना १००% काम होऊ शकत नाही. 
> बर.... यात एखाद्याला हटकावं तर लगेच गोंधळ सुरु होतो. 
> युनियन कामगारांसाठी असते कि युनियन अध्यक्षाला पोसण्यासाठी हेच कळत नाही. 
> स्थानिक लेबर कॉन्ट्रॅक्टर कडून होणार त्रास विचारायलाच नको 
> सर्व प्रकारच्या सरकारी अधिकाऱ्यांना भेटीच्या रूपात वेळोवेळी खंडणी द्यावी लागते. 
> स्थानिक राजकीय लोकांना प्रत्येक महिन्याला खंडणी द्यावी लागते 
> एखादी कंपनी सुरु व्हायला लागली कि लगेच कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, सिमेंट, खाडी, लोखंड सप्लायर्स यांचे माफियांच्या आवेशात काम देण्यासाठी धमकीवजा संपर्क सुरु होतात. यांना काम न दिल्यास कंपनी सुरूच होऊ शकत नाही. 
> उद्योजकांना सुद्धा प्रोडक्शन कॉस्ट कटिंग चे पुरेपूर ज्ञान नाही 
> छोटछोट्या खर्चांकडे कानाडोळा करण्याची सवय लागलेली आहे.
एखादी कंपनी सुरु होण्याआधी आणि सुरु झाल्यानंतर कित्येकांना वेळोवेळी खंडणी द्यावी लागते. लहान लहान उद्योजकांना व्यवसायाचे योग्य प्रशिक्षण नाही. सरकारकडून सवलती नाहीत, योग्य मार्गदर्शन नाही, कच्च्यामालाचे आणि मोठ्या कंपन्यांचे योग्य नियोजन नाही, अशावेळी उत्पादन खर्च वाढणारच आहे.
चिनी मालावर बहिष्काराचे मेसेज पाठवून तुम्ही चीन च काहीही वाकडं करू शकत नाही. यासाठी आपल्या कंपन्या चिनी कंपन्यांपेक्षा जास्त सक्षम कराव्या लागतील. ते करण्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागेल, कामात १००% ऊर्जा द्यावी लागेल, ज्याची अजूनतरी आपल्याला सवय लागलेली नाही.
तुम्ही चीन सारख्या देशावर बहिष्कार टाकूच शकत नाही. कारण बहीष्कार टाकायचा म्हटलं तर तुम्हाला तुमच्या जवळच्या ८०% वस्तूंचा त्याग करावा लागेल. जे तुम्हाला कधीच शक्य नाही. चीन ची घोडदौड थांबवण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे आपल्या देशाला उत्पादन क्षेत्रात आणि एकूणच सर्व क्षेत्रात चीनच्या दोन पावले पुढे नेणे. यासाठी फक्त सरकारवर अवलंबून राहून काहीच होऊ शकत नाही. प्रत्येकालाच प्रयत्न करावे लागतील. सरकार फक्त योजना आणू शकतं, शेवटी काम तर आपल्यालाच करायचं असतं. आणि हे काम कोणतंही असू शकेल. तुम्ही जे काम करता ते पूर्ण क्षमतेने करा. प्रत्येकाचा थोडाथोडा हातभार एकूणच प्रगतीला कारणीभूत ठरत असतो. आपल्या कामाने काय फरक पडणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. तुमचं काम करणं हि तुमची नाही तर तुमच्या देशाची गरज आहे. आणि हे तुम्ही जेवढं लवकर लक्षात घ्या तेवढं लवकर आपला देश प्रगतीची शिखरे पार करील.
तोपर्यंत आपलं व्हर्च्युअल देशप्रेम उफाळू द्या.